संगीत मानापमान मराठी सिनेमा रिव्ह्यू- sangeet manapasun marathi movie
सुबोध भावे यांचा भव्यदिव्य चित्रपट “संगीत मानापमान” रीलीझ झाला आहे. संगीतमानापमान या अजरामर नाटकावर हा सिनेमा बनला आहे. त्यामुळे घोषणा झाल्या पासून प्रचंड अपेक्षांचे ओझे या चित्रपटावर होते. ह्या चित्रपटाने ह्या अपेक्षा पूर्ण केल्या की नाही ते आज आपण ह्या रिव्ह्यू द्वारे सांगणार आहोत. चला तर ह्या सिनेमाच्या रिव्ह्यूला सुरवात करू.
कथा आणि पटकथा
ह्या सिनेमाची कथा तर जबरदस्त आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची, मूळ नाटकाची कथा एवढी कालातीत आहे की, आजवर ह्या कथेवर आधारित अनेक चित्रपट संपूर्ण भारतात बनले गेले आहेत. नाटकाचा सिनेमा करताना मूळ कथेला धक्का न देता पटकथा व्यवस्थित लिहिली गेली आहे. परंतु कथा सर्वांच्या परिचयाची आहे, त्यामुळे पटकथेमध्ये थोडी नाट्यमयता असती तर आणखी मजा आली असती. चित्रपट थोडा कमी लांबीचा केला असता तर जास्त प्रभावशाली झाला असता. लांबलेल्या पटकथे मुळे चित्रपट काही वेळा संथपणे पुढे सरकतो.
साधारण कथानक पहायचे तर संग्रामपूर राज्यातील ज्येष्ठ सेनापतीना निवृत्त व्हायचे असते. आपल्याजागी उपसेनापती चंद्रविलासची म्हणजे सुमीत राघवन यांचा सेनापती पदावर निवड करण्याचा त्याचा विचार असतो. सेनापतींची मुलगी भामिनी म्हनजे वैदेही परशुरामी आणि चंद्रविलास या दोघात लहानपणापासून मैत्री असते. चंद्रवीलास महत्वाकांक्षी आणि स्वार्थी असतो. काहीही करून सेनापतीपद मिळवावे आणि भामिनीशी लग्न करावे ही त्याची इच्छा असते.
दुसरीकडे एका गरीब वस्तीत राहणारा धैर्यधर म्हणजे सुबोध भावे हा धाडसी असतो. आपल्या पराक्रमाच्या जोरावर तो संग्रामपूरच्या सैन्यात भरती होतो. ज्येष्ठ सेनापती यांना धैर्यधराचे व्यक्तिमत्व आवडते. अशा पराक्रमी मुलाशी आपल्या मुलीचे लग्न व्हावे असे त्यांना वाटते. म्हणून भामिनीच्या वाढदिवशी ते धैर्यधराशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवतात. पण ह्या प्रस्तावाला भामिनी वाईटरित्या धुडकावून लावते आणि याशिवाय धैर्यधराच्या कुटुंबाचा अपमान करते.
सर्वांसमोर आईचा भामिनीने केलेला अपमान धैर्यधराला सहन होत नाही. वर आणखी चंद्रविलास भामिनीच्या मनात धैर्यधराबद्दल विष कालवतो. मग सुरु होते मान-अपमानाचे द्वंद्व. हे नाट्य अनुभविण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल.
अभिनय
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे तर 'संगीत मानापमान'मध्ये सर्वच कलाकारांनी सुंदर अभिनय केलाय. त्यात विशेष करून सुमित राघवन याने चंद्रविलासच्या भूमिकेत कमाल केली आहे. कपटी, गर्विष्ठ, अभिमानी, महत्त्वाकांक्षी चंद्रविलास त्याने अप्रतिम रेखाटला आहे. वैदेही परशुरामीने भामिनी चांगली उभी केली आहे. धैर्यधरच्या भूमिकेत सुबोधनेही छान काम केलंय. मात्र एका पराक्रमी सैनिकांची भूमिका असल्यामुळे रांगडेपणा आणि रूबाबदारपणा कमी पडला आहे. त्यामुळे चित्रपट अधुरा वाटतो. धीरेन राजेंच्या भूमिकेत उपेंद्र लिमयेने चांगले काम केले आहे. शैलेश दातार, नीना कुळकर्णी, निवेदिता सराफ यांनीही आपापल्या भूमिकाना न्याय दिला आहे.
संगीत
कट्यार काळजात घुसली प्रमाणेच संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. मात्र कट्यारची जादू इथे अनुभवायला मिळत नाही.
जी गाणी लहानपणापासून ऐकत आलोय त्यांना चित्रपटात वेगळ्या रीतीने मांडले गेले आहे. ते काही फारसे जमलेले नाही. नाट्यगीते जशी आहेत तशी ठेवली असती तर जास्त परिणामकारक झाली असती. कट्यार मध्ये गाण्यांनी सिनेमा उचलला होता. मात्र इथे पूर्णपणे उलटे झाले आहे. गाणी सिनेमाचा प्रभाव कमी करतात.
त्यामुळे मूळ नाटकांचे चाहते असतील तर त्यांच्या पदरी निराशा पडणार आहे. बाकी प्रसंगा नुसार बॅकग्राऊंड म्युझिक उत्तम आहे.
सिनेमॅटोग्राफी आणि सेट डिझाइन
सिनेमॅटोग्राफी आणि सेट डिझाइन्स ह्या गोष्टी लाजबाब झाल्या आहेत. पात्रांची ओळख करुन देताना वापरलेली गाणी आणि सेट आपल्याला जुन्या काळात घेऊन जातात. राजवाड्याचा भव्यदिव्य सेट, बाजारपेठ अशा बाबींवरही बारकाईने काम केले आहे.
दिग्दर्शन
दिग्दर्शक म्ह्णून सुबोध भावे यांनी चांगले काम केले आहे. काही काही प्रसंग सुंदर रीतीने खूलविले आहेत. त्यांनी केलेली मेहनत दिसून येते. पात्रांची ओळख करून देतानाची कल्पकता सूंदर आहेत. धैर्यधर म्हणून स्वतःला उभे करणे फारसे जमले नाहीये. काही प्रसंगांना कात्री लावून चित्रपट अधिक वेगवान बनवायला हवा होता. नाट्यगीतांना मूळ चालीत ठेवूनही योग्य परिणाम साधता आला असता. निदान तसा प्रयत्न तरी करून पाहायला हवा होता. जास्त गाणी आणि संथ पटकथा यामुळे प्रेक्षक बोरं होऊन जातो. क्लायमॅक्स वगळता ऍक्शन सिन फारसे जमले नाहीयेत.
Overall पाहता संगीत मानापमान अपेक्षित उंची गाठत नाही. नाटकाची चित्रपटाशी तुलना करणे चुकीचे आहे. मात्र तुलना केलीच तर संगीत मानापमान या नाटकासमोर तर चित्रपट फारच उथळ आहे. जे नाटकाचे आणि नाट्यगीताचे चाहते आहेत त्यांची घोर निराशा झाली आहे. मात्र चित्रपटाच्या काही उजव्या बाजू आहेत. त्यामुळे हा चित्रपट एकदा चित्रपटगृहात जाऊन पहावा लागेल. सर्वात पहिले कारण म्हणजे हा मराठी सिनेमा आहे. अशा अजरामर नाटकाला हात लावणे म्हणजे मोठे हिमतीचे काम आहे. ही मोठी जबाबदारी पेलण्याचे धाडस निर्मात्यांनी केले यासाठी त्यांचे अभिनंदन. चित्रपटावर केलेला खर्च दिसून येतो. त्यामुळे काही काही प्रसंगात चित्रपट उठुन दिसतो.
समीर सामंत यांनी प्रसंगा नुसार सूंदर गीते लिहिली आहेत. कॅमरावर्क चांगले आहे. प्राजक्त देशमुख यांनी चित्रपटातले संवाद उत्तम लिहिले आहेत.सर्व कलाकरांनी आपापली पात्रे इमानदारीने रेखाटली आहेत. त्यामुळे एकदा हा सिनेमा चित्रपट गृहात जाऊन पहावा असाच आहे. एकूणच आम्ही या सिनेमाला देतो 3 स्टार. बाकी तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा.