Mukkam post bombilwadi teaser review मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी कसा आहे टिझर

प्रशांत दामले आणि परेश मोकाशी डेडली कॉम्बिनेशन -मुक्काम पोस्ट बोंबीलवाडीचा धमाकेदार टिझर

मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी



२००१ साली परेश मोकाशी यांचे ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हे नाटक  आले होते जे प्रेक्षकांच्या स्मरणात राहीले आहे. त्यावेळी लोकांनी हे अतरंगी नाटक उचलून धरले होते. आता या नाटकावर परेश मोकाशी त्याच नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत. 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी चे लेखन आणि दिग्दर्शन परेश मोकाशी आणि मधूगंधा कुलकर्णी यांनी केले आहे. ही जोडी म्हणजे सिनेमा हिटच असणार हे समीकरण पक्के आहे.
या जोडीने हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ , ची आणि ची सौ का, आत्मपॅम्प्लेट, ‘वाळवी’ , नाच ग घुमा नाविन्यपूर्ण आणि जबरदस्त असे एकापेक्षा एक सरस असे सिनेमे काढले आहेत.

नुकताच मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी या त्यांच्या नव्या चित्रपटाचा मजेशीर टिझर प्रसिद्ध झाला. टिझर पाहिल्यावर चित्रपट तुफान विनोदी असणार आहे हे आपल्याला समजून येते. चला तर टिझरचा रिव्ह्यू पाहू


Mukkam post bombilwadi tease review in marathi


हा सिनेमा म्हणजे बोंबिलवाडीसारख्या छोट्या गावात विनोदी घटना घडत असतात. आणि त्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाशी निगडित आहेत. अशी फार्सीकल कॉमेडी गोष्ट म्हणजे हा सिनेमा आहे. हे पहिल्याच सिन मध्ये अपल्याला दिसून येते.

दुसरे महायुद्ध म्हणजे हिटलर आलाच. आता ह्या हिटलरांच्या ऍडॉल्फ ची मध्यवर्ती भूमिका कॉमेडी किंग प्रशांत दामले यांनी साकारली आहे. कोणा राजाशी त्यांचे फोनवर चाललेले बोलणे दाखवत टिझर सुरू होतो. 'हाताशी तोंडाशी.. गळ्याशी. ओके पाळले बोके खोक्यावर खोके..बॉडीवर डोके.. असे विचित्र संभाषण फोनवर चालत हा  टिझर सुरू होतो. म्हणजे एकूणच चित्रपट मॅड कॉमेडी असणार हे पक्के होते. नंतर हिटलर रुपी प्रशांत दामले फोनवर बोलताना 'हाजी हाजी नाझी नाझी' अशी शाब्दिक कोटी करत एकूणच टिझरचा कॉमेडी मूड सेट करतात.

पहिला सिन कट झाल्यावर दुसऱ्या सिन मध्ये एक कुटुंब गोलाकार बसून एका हातबॉम्बकडे कुतुहलाने पाहताना दिसते. या कुटूंबात गीतांजली कुलकर्णी, वैभव मांगले, प्रणव रावराणे, रितिका शोत्री, सुनील अभ्यंकर, मनमित पेम असे अतरंगी सदस्य असतात. घरातीलच एका अवली होतकरू सायंटिस्टने घरातच तो बॉम्ब बनविल्याचे समोर येते. "बॉम्ब म्हणजे काय अळूची वडी आहे का ? घरी बनवायला जीवही गेला असता" असे घाबरत गीतांजली कुलकर्णी बोलतात. यावर "बॉम्ब हा जीव घेण्यासाठीच बनवला जातो" असे प्रणव रावराणे बोलून जातो आणि तोंडावर हसू येते. या वेळी कुटुंबाचे   अतरंगी चाळे थिएटर मध्ये बघायला मजा येईल यात तिळमात्र शंका नाही.

नंतर इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल दिसून येतात. हा रोल आनंद इंगळे यांनी साकारला आहे. इंग्लंड आणि जर्मनी युद्धाची तयारी करतानाचा हा सिन आहे. यावेळी अचानक हिटलर प्रशांत दामले चर्चिल यांच्या तळावर विमानाने बॉम्ब हल्ला करून युद्ध सुरू झाल्याची ग्वाही देतो.

मुळात मुक्काम पोस्ट बोंबीलवाडीची कथाच भन्नाट आहे. अशी कॉमेडी हल्ली सहसा पाहायला भेटत नाही. सध्या फार्सीकल गोष्टीवर सिनेमे बनत नाही त्यामुळे प्रेक्षकांनी ही संधी सोडता कामा नये. सध्याच्या काळात लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत त्यामुळे कधी कुठल्या गोष्टींने लोकं भडकतील हे सांगता येत नाही त्यामुळे, फार्सीकल कॉमेडीला कोणीही सहसा हात लावत नाही.

नाटकाच्या काही मर्यादा असतात, त्यामुळे कथा फुलवताना काही गोष्टी दाखवता येत नाहीत. मात्र चित्रपटात जास्त मोठ्या कॅनव्हासवर त्या गोष्टी दाखवून विनोदाची एक वेगळी उंची गाठता येते म्हणून नाटकापेक्ष चित्रपट जास्त कॉमेडी असणार हे पक्के आहे.

परेश मोकाशी यांनी नाटक जसेच्या तसे न उचलता त्यात काही परिणाम कारक बदल केलेत जेणेकरून चित्रपट पाहताना आणखी मजा येईल.
एकूणच मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी हा सिनेमा must watch आहे. परेश मोकाशी यांच्या कथेवर आणि दिग्दर्शनावर डोळे बंद करून विश्वास ठेवता येईल. आता त्याचबरोबर प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, प्रणव रावराणे, रितिका शोत्री, सुनील अभ्यंकर, मनमित पेम अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे आपले दोन तीन तास भन्नाट आनंदाने घालवायचे असतील तर 1 जानेवारीला चित्रपटगृहाला नक्की भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने