क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम परीक्षण आणि कमाई
या नवीन वर्षाच्या सुरवातीलाच क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट रिलीज झाला आहे. राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा एकामागोमाग एक बंद पडत चालल्या आहेत या वास्तवावर थेट प्रेक्षकाला अंतर्मुख करायला भाग पाडणारा असा हा सिनेमा आहे. हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही तो सामाजिक वास्तव मांडतो. चित्रपटाची थीम तर उत्तम आहे मात्र तांत्रिकदृष्ट्या सिनेमा कसा बनला आहे हे पाहुया. चला तर जाणून घेऊ या सिनेमाचा सविस्तर रिव्ह्यू.
कथा, पटकथा आणि संवाद
या चित्रपटाचे कथानक अलिबाग नागांव येथील क्रांतीज्योती विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेभोवती फिरतं. साधारण ९० वर्षे जुनी असलेली ही शाळा आता पाडून त्या ठिकाणी 'इंटरनॅशनल स्कूल'ची उभारणी करण्यात येणार आहे. मराठी शाळेची पटसंख्या कमी होत चालली आहे, इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे जमीन मालकाचे फावले असून शाळा पडून आता तिथे इंटरनॅशनल स्कूल बांधून शिक्षणाचे व्यावसायिकरण करण्याचा त्याचा मानस आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिर्के सर म्हणजे सचिन खेडेकर हे शाळा वाचवण्यासाठी पुढे येतात. ते शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना बोलावून शाळेसाठी लढण्याचे आवाहन करतात. शाळेसाठी नाही तर शिरके सरांच्या आदराखातर माजी विद्यार्थी येतात. मग पुढे काय काय होतं? शिर्के सरांची शाळा वाचवण्याची धडपड किती कामाला येते आणि ती शाळा वाचते का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी तुम्हाला थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पहावा लागेल.ही कथा केवळ एका शाळेभोवती फिरत नाही, तर अख्या महाराष्ट्रातील असंख्य मराठी शाळांचे वास्तव मांडते. सुंदर कथा योग्य अशा पटकथेच्या माध्यमातून पुढे सरकत जाते. हेमंत ढोमेने संवाद - वादविवाद यांचा आधार घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि नंतर त्यातून उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे .लेखन, पटकथा आणि संवाद हे या सिनेमाचं प्रमुख सामर्थ्य आहे. संवाद कुठेही कृत्रिम वाटत नाहीत. मराठी भाषा, बोलीभाषा आणि पोटभाषा यांचा सन्मान राखत सकस लेखन केलं गेलंय. प्रत्येक मुद्दा योग्य शब्द वापरून प्रेक्षकांच्या काळजाला भिडेल याची काळजी घेण्यात आली आहे. कथा पटकथा आणि संवाद यांना आम्ही देतोय पाचपैकी ४ स्टार.
अभिनय
दमदार कलाकार आणि कसदार अभिनय ही या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद आहे.अमेय वाघने साकारलेलं आग्री मुलाचं पात्र हसत खेळत आपल्या मनाचा ताबा घेते. अमेयनं ही खट्याळ पण तेवढीच इमोशनल व्यक्तिरेखा सुरेख वठवली आहेसिद्धार्थ चांदेकरने साकारलेले अभिनेत्याचे पात्र त्याला एकदम सूट झाले आहे. या बरोबरच प्राजक्ता कोळीनेही आपल्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. मात्र काही इमोशनल सीन मध्ये तिचा नवखेपणा दिसून येतो. अमेय, सिद्धार्थ आणि प्राजक्ता हे त्रिकुट आपल्याला आपल्या शाळेतल्या मित्रांची आठवण करून देते. या तिघांची केमिस्ट्री बघताना खूपच धमाल येते. हरीश दुधाडेने वकील आणि शेतकऱ्याच्या भूमिकेत प्रभावीपणे काम केले आहे. यांच्या जोडीला कादंबरी कदम आणि पुष्कराज चिरपुटकर दुबईत राहत असूनही आपल्या शाळेप्रति असलेलेली कणव अभिनयातून उत्तम प्रकारे व्यक्त करतात. या कलाकारांनी आपापली पात्रे इतकी सहज साकारली आहेत की त्यांना पहाताना शाळेतले मित्र आठवतात. बाकी क्षिती जोग ही सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेत शोभून दिसते. चित्रपटात तिची आणि अनंत जोग यांची जुगलबंदी पाहायला मजा येते. निर्मिती सावंत यांनी नार्वेकर बाई म्हणून नेहमीप्रमाणे सहज अभिनय केला आहे. या सगळ्यांत नेहेमीप्रमाणे सचिन खेडेकर यांनी आपली भूमिका चोख साकारली आहे. ते मुख्याध्यापकाच्या भूमिकेत कमाल करतात. ते मोनोलॉग expert असुन या चित्रपटातही त्यांचा मोनोलॉग थेट आपल्या काळजाला भिडतो. ओव्हरऑल या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आम्ही देतोय ४.५ स्टार.
संगीत
चित्रपटाच्या संगीत गाण्यांबद्दल बोलायचं तर, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गाण्याने सर्वांना भुरळ पाडली आहे. बाकी संगीत आणि गीतलेखनाची जबाबदारी folk आख्यान फेम कलाकारांनी निभावली आहे. हर्ष-विजय यांचं संगीत पटकेथेला साजेसे आहे. ईश्वर अंधारे यांनी आशयाला धरून गाणी लिहिली आहेत. या कलाकारांनी पदार्पणातच चांगला काम केले आहे. मात्र कधी कधी गाणी चित्रपटाचा वेग कमी करतात आणि उगाच घुसवल्यासारखी वाटतात.आम्ही संगीत आणि गाण्यांना देतोय ३.५ स्टार.दिग्दर्शन
चित्रपटाची धुरा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सांभाळली आहे. त्याने यापूर्वीही फसक्लास दाभाडे, 'पोस्टर गर्ल', 'बघतोस काय मुजरा कर', 'झिम्मा' अशा अनेक चित्रपटात सामाजिक विषय मनोरजंक पद्धतीने मांडले आहेत. मात्र अशा समान विषयामुळे एकसुरीपणा येण्याचा धोका असतो. पण हेमंताने हा धोका बऱ्यापैकी टाळला आहे. क्रांतीज्योती मध्ये त्याने मांडलेले मुद्दे त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा अधिक प्रखर आणि थेट असून मराठी माणसाच्या अस्मितेला हात घालतात. त्याने या वेळी बेधडक प्रश्न मांडले आहे आणि या प्रश्नांना साजेशी उत्तरेही या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. या बरोबरच आपल्या सर्वांच्या शाळेच्या आठवणी, तो नॉस्टॅल्जिया सुद्धा त्याने बरोबर पकडला आहे. आजची विदारक परिस्थिती आणि भविष्यातील धोका पटवून देऊन प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्यात तो यशस्वी झाला आहे. त्याच्या दिग्दर्शनात एकाच त्रुटी जाणवते म्हणजे चित्रपट थोडा खेचला गेला आहे. काही अनावश्यक प्लॉट कट करून अडीच तासाचा हा सिनेमा दोन तासाचा केला असता तर जास्त क्रिस्पी आणि मजेदार वाटला असता. चित्रपट काही ठिकाणी रेंगाळतो आणि हळूहळू पुढे सरकतो. बाकी वातावरण निर्मितीला शंभर पैकी शंभर मार्क, शाळेचे वर्ग, मैदान, परिसर, शिक्षक असे सर्वकाही प्रेक्षकांना त्यांच्या आठवणींच्या शाळेत घेऊन जाते. ऐकूनच दिग्दर्शनाला आम्ही देतोय ४ स्टार.अशा प्रकारे हा चित्रपट सर्व आघाड्यांवर उत्तम जमून आला आहे. मराठी सामाजिक चित्रपटांच्या परंपरेला साजेसाल असून मनोरंजना सोबतच विदारक वास्तव मांडतो आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. मराठी प्रेक्षकांना must watch असाच हा सिनेमा असून उत्तम कलाकृती पाहण्याचे समाधान देणारा आहे. ओव्हरऑल आम्ही या सिनेमाला देत आहोत चार स्टार.
Tags:
मनोरंजन
